सिल्लोड : जिल्हा परिषदेच्या नऊ गटात ७७ टक्के मतदान

Foto
किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

सिल्लोड, (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या नऊ गट व पंचायत समितीच्या अठरा गणांसाठी अंदाजे ७७ टक्के मतदान झाले. सकाळच्या टप्प्यात मतदान संथ गतीने सुरू होते. दुपारनंतर मतदानाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. सकाळी दोन तासात तालुक्यात १४.४६ टक्के मतदान झाले. 

तर साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ५८.६४ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. शेवटच्या दोन तासात मतदान केंद्रावर अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. तालुक्यातील एकूण ३०५ मतदान केंद्रांवर जिल्हा परिषदेच्या नऊ गटासाठी ३९ उमेदवार व पंचायत समितीच्या १८ गणांसाठी ६२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.

अंभई गटातील नाणेगाव येथील मतदान केंद्रावर क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला. तर पांगरी केंद्रावर बोगस मतदान करण्याच्या संशयावरून बाचाबाची झाली. मतदानाची वेळ संपण्यादरम्यान अंभई येथे मतदान केंद्रासमोर दोन गटात वाद झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगविले.